

जळगाव 29 एप्रिल 2025 : गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेणाऱ्या चुंचाळे ग्रामपंचायतीविरोधात पत्रकारांनी आता रस्त्यावर उतरून लोकशाहीचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात आजपासून प्राजक्ता संजय तायडे व सुजाता ठाकूर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात झाली.
उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे सहा ठोस मागण्या मांडल्या असून त्यामध्ये मुख्यत्वे ग्रामसभा न घेणे, निधीच्या वापरातील अपारदर्शकता, घरकुल प्रकरणातील अनियमितता आणि जात वैधता नसलेल्या सदस्यांविरोधात कारवाई यांचा समावेश आहे.
प्रमुख मागण्या:
दोन वर्षांपासून एकही ग्रामसभा न घेतल्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप करत, जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे निधीचा अपव्यय व मनमानी कारभाराची सखोल चौकशी करावी.
ग्रामपंचायत मार्फत घरकुल योजनेमध्ये चेक मंजूर केलेले असून प्रत्यक्षात जागेवर घरांचे काम झालेले नाही त्यामुळे घरकुल मंजुरीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करावी. सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या BDO अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय झालेल्या कामांबाबत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
उपोषणकर्त्या महिलांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आता मौन सोडून प्रत्येक ग्रामस्थाने आवाज उठवायला हवा,” असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या दुर्लक्षाने अस्वस्थ झालेल्या पत्रकारांनी आता कृतीतून निषेध व्यक्त करण्याचा मार्ग निवडला असून या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




