

यावल – यावल उपविभागीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेल्या भीम आर्मी भारत एकता मिशनच्या कार्यकर्त्यांनी आज अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली, रिकाम्या खुर्चीला हार घालून अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे वारंवार अनुभवास येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती. या निषेध आंदोलनादरम्यान बोलतांना गणेश सपकाळे यांनी उपरोधिक भाषेत म्हटले, “अधिकारी वेळेवर येत नाहीत, पण त्यांची खुर्ची मात्र नेहमी वेळेवर असते. त्यामुळे तिचाच प्रामाणिकपणासाठी सत्कार केला.”
या वेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर, आकाश बिऱ्हाडे, सागर मेघे, विक्की तायडे, विशाल वाघमारे यांच्यासह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.
हा ‘खुर्ची सत्कार’ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने बघणार आहे की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



