
जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन अक्षय जाधव यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. निधी शर्मा यांनी करून बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका व त्यांच्या सक्षमीकरणाची गरज अधोरेखित केली. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी शिक्षिका प्रियंका पाटील यांनी “गूगल माहिती देऊ शकते, पण संस्कार नाही” असे मत व्यक्त केले. तसेच सुनिता पाटील, ज्योती पाटील यांनी मनोगत मांडले तर मीनाक्षी पाटील यांनी शिक्षक झाल्यानंतरचे अनुभव सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रतिभा पाटील यांनी शिक्षकांकडे विषयातील प्रभुत्वाबरोबरच नृत्य, गायन, खेळ, चित्रकला यांसारखी अन्य कौशल्येही असणे गरजेचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी “शिक्षकांचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असावा, कारण विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतात” असे मत व्यक्त केले.
आभार प्रदर्शन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रियंका पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






