

जळगाव – सद्गुरु शिक्षण सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे आज सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. निधी शर्मा यांनी केली. त्यांनी राजमाता जिजाऊंना ‘स्वराज्याची शिल्पकार’ तर स्वामी विवेकानंदांना ‘युवकांचे प्रेरणास्थान’ म्हणून संबोधत त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. जिजाऊंच्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, तर स्वामी विवेकानंदांनी वेदांत व योगाच्या माध्यमातून भारताची कीर्ती जगभर पोहोचवली, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन माधुरी ठाकरे यांनी केले. यावेळी मीनाक्षी पाटील व पल्लवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा युवा पिढीवर होणारा प्रभाव अधोरेखित केला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी सांगितले की, केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा, शौर्य, नैतिकता आणि स्वराज्याची दृष्टी देणारे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे. अशा संस्कारांतून स्वाभिमानी, पराक्रमी व मानवतावादी नागरिक घडतात, जे देशासाठी जगायला व लढायला शिकतात. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना युद्धकला, राजनीती व प्रजाहिताचे धडे देऊन स्वराज्याची प्रेरणा दिली, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अक्षय जाधव यांनी केले. या कार्यक्रमास सहाय्यक प्रा. डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, सुवर्णा अहिरे, प्राध्यापक निधी शर्मा, श्री. पंकज वाघ तसेच महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




