
जळगाव – येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “अभ्यास मित्र” या उपक्रमांची सुरुवात करण्याचा ठराव बाल सभे सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळणार आहे.
बालसभा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वक्तृत्व, कविता सादरीकरण, नाट्यछटा, सामान्य ज्ञान यांसारख्या विविध कलागुणांना वाव मिळणार आहे. तर “अभ्यास मित्र” उपक्रमामध्ये प्रगत व अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांची जोडी करून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून शिक्षण अधिक सोपे व प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी या उपक्रमांचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच शिक्षिका रूपाली आव्हाड व पर्यवेक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
या निर्णयाचे पालक व शिक्षक वर्गातून स्वागत करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्याची भावना व शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.






