
जळगाव : मेहरूण येथील स्मशानभूमी विकसित करण्याच्या मागणीसाठी दिलेल्या निवेदनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुढील काळात तिरडी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी व किरण राजपूत यांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिनांक ०६ मार्च २०२६ रोजी त्यांनी सादर केलेल्या निवेदनात मेहरूण स्मशानभूमीच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करावा, तसेच आवश्यक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागण्यांचा महानगरपालिके तर्फे कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

यासह सदर निवेदनामध्ये स्मशानभूमी विकसित करतांना अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी शेड, कंपाऊंड, लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था करणे, महादेव मंदिराकडून येणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, स्मशानभूमीतून जाणारा वाहतुकीचा रस्ता बंद करणे, नवीन ओटे तयार करणे, तसेच लाईट व पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
याबाबत तातडीने १ महिन्यात स्मशानभूमीच्या विकासासाठी कार्यवाही न झाल्यास मेहरूण परिसरातील नागरिकांच्या वतीने महानगरपालिका समोर तिरडी मोर्चा काढण्यात येईल व उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.





