जळगावक्राईम

जळगाव शहरात कर्कश सायलेंसरविरोधात विशेष मोहीम; २५० वाहनांवर कारवाई

जळगाव : जळगाव शहरात वाढत चाललेल्या कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी सायलेंसरमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल २५० वाहनांवर कारवाई करण्यात आली.

सन २०२६ मध्ये जळगाव शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत कर्कश आवाज करणारे सायलेंसर बसवून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. अनेक वाहनचालक कंपनीने बसवलेल्या सायलेंसरमध्ये बदल करून कर्कश आवाजाचे सायलेंसर बसवतात, त्यामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करत २५० वाहनांचे नंबर प्लेट जप्त करण्यात आले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सन २०२५ मध्ये एकूण ३३१ अपघात झाले असून, त्यात ४७८ जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपल सीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आदी नियमभंग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच, जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी जिल्हा’ करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समितीमार्फत जनजागृती आणि कारवाई दोन्ही गोष्टींवर भर दिला जाणार असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button