
जळगाव – डॉ. सोनल खलाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. रेणुका चव्हाण यांच्या उपस्थितीत आज Maharashtra Police अंतर्गत जळगाव पोलिसांच्या वतीने “पोलीस काका / पोलीस दीदी” योजने संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले.
या कार्यशाळेत संबंधित अंमलदारांना शालेय विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद कसा साधावा, विद्यार्थ्यांचे समुपदेशन कशा पद्धतीने करावे, एखादी घटना घडल्यानंतर आवश्यक SOP कशी पाळावी तसेच अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर बंधने कोणती असतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान विविध प्रात्यक्षिके, डेमो आणि रोल प्ले सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास, त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये पोलिसांनी कोणती भूमिका घ्यावी यावर विशेष भर देण्यात आला.
“पोलीस काका / पोलीस दीदी” योजना काय?
“पोलीस काका / पोलीस दीदी” ही योजना Maharashtra Police यांच्या कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना ईव्ह-टीझिंग, रॅगिंग, ड्रग्स, सायबर गुन्हे आणि हिंसाचार यांसारख्या धोक्यांपासून संरक्षण मिळावे तसेच त्यांना वेळेवर मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही योजना राबवली जाते.
या योजनेअंतर्गत पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यामुळे पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात विश्वासाचे नाते अधिक मजबूत होण्यास मदत होते.
नियुक्ती व जबाबदाऱ्या
प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांसाठी PC ते ASI दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. मुलींच्या शाळांसाठी विशेषतः “पोलीस दीदी” नेमण्यात येते. एका पोलीस काका किंवा दीदीकडे साधारण दोन ते तीन शाळांची जबाबदारी असते.
योजनेवर संबंधित पोलीस निरीक्षक देखरेख करतात, तर एका PSI ला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. समन्वयासाठी WhatsApp ग्रुपचीही व्यवस्था केली जाऊ शकते.
तक्रारींवर तातडीने कारवाई
शाळांभोवती ईव्ह-टीझिंग, हिंसाचार किंवा विद्यार्थ्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी आल्यास पोलीस काका/दीदी तातडीने मदत करतात. आवश्यकतेनुसार बीट मार्शल, बीट स्टाफ किंवा दामिनी स्क्वॉडची मदत घेऊन प्रभावी कारवाई केली जाते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षा, आत्मविश्वास आणि पोलिसांवरील विश्वास वाढवण्यासाठी “पोलीस काका / पोलीस दीदी” योजना महत्त्वपूर्ण ठरत असून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रभावी माध्यम ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.






