जळगावसामाजिक

वर्दीतील संवेदनशील चेहरा, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे

जळगाव – शासकीय अधिकारी आणि पोलीस म्हटले की त्यांच्या कामात कठोर निर्णय, दबाव, टीका आणि अनेक चांगल्या-वाईट गोष्टी येत असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एखाद्या अधिकाऱ्यामध्ये असलेली माणुसकी, संवेदनशीलता आणि आपुलकी दिसली की मन खरंच भारावून जाते.

जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी एका मृत हवालदाराच्या लहान मुलीला स्वतःच्या कार्यालयात प्रेमाने बोलावून घेतले, तिची आपुलकीने विचारपूस केली आणि तिला शालेय साहित्य व इतर भेटवस्तू देऊन तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले… हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर ती एका संवेदनशील मनाची जिवंत ओळख होती.

यापूर्वीही उन्हात रस्त्याच्या कडेला बसून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला व किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या छत्र्या आणि मिल्टनच्या पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांनी दाखवलेली सामाजिक जाणीवही तितकीच कौतुकास्पद होती.

विशेष म्हणजे, एकदा साध्या वेशात काव्यरत्नावली चौकात बसलेल्या काही सामान्य नागरिकांजवळ जाऊन त्यांनी अगदी सहज संवाद साधला. त्या व्यक्तींमध्ये काही जण उद्योजक तर काही निवृत्त नागरिक होते. त्यांना हेही माहिती नव्हते की आपल्याशी संवाद साधणारे व्यक्ती हे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. पदाचा कोणताही आव न आणता सामान्य माणसांमध्ये मिसळण्याची ही शैली अनेकांच्या मनाला भावून गेली.

पोलीस अधीक्षकांच्या या संवेदनशील आणि आपुलकीच्या वर्तणुकीमुळे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या असून, अनेक नागरिक त्यांचे खुलेपणाने कौतुक करताना दिसत आहेत.

खाकी वर्दीतील ही माणुसकीच समाजाला सर्वाधिक आश्वस्त करते. अधिकार, पद आणि जबाबदाऱ्या यांच्यासोबत जर अशी संवेदनशीलता जपली गेली, तर लोकांच्या मनात पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो.

अशा संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या कार्याला मनापासून सलाम…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button