
जळगाव, दि. २३ जून २०२६ : सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी टी.ई.टी. (Teacher Eligibility Test) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना टी.ई.टी. परीक्षेची सखोल माहिती देणे, अभ्यासाचे योग्य नियोजन समजावून सांगणे व विविध विषयांवरील मार्गदर्शन करणे हा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रतिभा पाटील या होत्या.कार्यशाळेच्या समन्वयक डॉ जयश्री पाटील या होत्या.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अनिता वानखेडे, प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा तसेच प्रा. डॉ. अनिता जावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर डॉ. प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना टी.ई.टी. परीक्षेचे महत्त्व, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेची रचना तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अध्ययन कौशल्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
यानंतर मानसशास्त्र या विषयावर प्रा. डॉ. अनिता वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना विविध मानसशास्त्रीय संकल्पना, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया आणि परीक्षेतील प्रश्न सोडविण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या.
इंग्रजी व मराठी व्याकरण या विषयावर प्रा. डॉ. जयश्री पाटील यांनी भाषिक कौशल्यांचा विकास, व्याकरणातील महत्त्वाचे घटक तसेच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
समाजशास्त्र (भूगोल) या विषयावर प्रा. सुवर्णा अहिरे यांनी विद्यार्थ्यांना भूगोलातील महत्त्वपूर्ण संकल्पना, नकाशा अध्ययन आणि परीक्षाभिमुख तयारी याविषयी माहिती दिली.
तसेच विज्ञान व गणित या विषयांवर प्रा. निधी शर्मा आणि प्रा. डॉ. अनिता जावे यांनी विद्यार्थ्यांना विविध संकल्पना, सूत्रे, सोडवणुकीच्या पद्धती आणि परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यास तंत्रांचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून नियमित व नियोजनबद्ध अभ्यास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा अत्यंत यशस्वी व फलदायी ठरली.






