जळगावराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महानगर अध्यक्ष पदी अशोक लाडवंजारी

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक सिताराम लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. ८) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुनील भुसारा तसेच प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार उपस्थित होते.

अशोक लाडवंजारी यांनी यापूर्वीही महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, ही त्यांची दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती झाली आहे. पक्षाप्रती असलेली निष्ठा, संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते एकनाथराव खडसे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी भाजपचे महानगराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

लाडवंजारी हे जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असून, जिल्हा नियोजन समिती सदस्य, महानगरपालिका स्थायी समिती सदस्य तसेच शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. ते नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष असून श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.

नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरजू नागरिकांना कपडे, ब्लँकेट, अन्नधान्य तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू महिलांना साड्यांचे वितरण अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे.

या नियुक्तीमुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरातील पक्षसंघटना अधिक सक्षम, गतिमान व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची विचारधारा घराघरात आणि प्रत्येक प्रभागात पोहोचविण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

लाडवंजारी यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाचे नेते आमदार एकनाथराव खडसे, महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, दिलीप खोडपे सर यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button