
मेहरुण – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा मा.नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध शालेय क्लबांची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या अंतर्गत हेल्थ अँड वेलनेस क्लब, विज्ञान क्लब, पर्यावरण क्लब, वाचन क्लब, क्रीडा क्लब तसेच कला व सांस्कृतिक क्लब यांची स्थापना करून प्रत्येक क्लबसाठी शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक क्लबमार्फत वर्षभर विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यशाळा, प्रात्यक्षिके, जनजागृती मोहिमा आणि कौशल्यविकास कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
हेल्थ अँड वेलनेस क्लबच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, पोषण जनजागृती, योग, मानसिक आरोग्य, प्रथमोपचार व स्वच्छतेसंदर्भातील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विज्ञान क्लबच्या माध्यमातून प्रयोग, विज्ञान प्रदर्शने, प्रकल्प स्पर्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे उपक्रम तसेच नवोपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
संस्थाध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा विकास केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. विविध क्लबांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, जबाबदारी, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांना पूरक असा हा उपक्रम आहे.”
मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी क्लब प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधींना मार्गदर्शन करून वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. या अभिनव उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले असून विद्यालयाच्या या प्रयत्नाचे परिसरातूनही कौतुक होत आहे.






