जळगावसामाजिक

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारतीचे निवेदन

जळगाव, दि. ५ सप्टेंबर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री चव्हाण यांचे मार्फत पाठविण्यात आले.

शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांना काळ्या फिती लावून अध्यापनाचे काम करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून, शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा जोडण्यात यावी, तसेच RTE Act 2009 पूर्वी व १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी शासन निर्णयानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET मधून सूट देण्यात यावी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, तसेच BLO, SIR आदी कामांतून शिक्षकांची मुक्तता करावी, शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षक पदाचा सन्मान राखावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“शिक्षकांची सेवा, सुरक्षितता, सन्मान आणि शैक्षणिक गुणवत्ता हे महत्त्वाचे प्रश्न असून शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य कार्यवाही करावी,” अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी गांधीजींना अभिवादन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, नारायण वाघ, तालुकाध्यक्ष पंकज गरुड आणि कार्याध्यक्ष अनुपकुमार पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button