जळगावक्रिडा

राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धेला एकलव्य क्रीडा संकुलात सुरुवात

जळगाव, दि. ३ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्य स्टेट व्हेटरन्स असोसिएशन आणि जळगाव जिल्हा प्रौढ जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धेला एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरण तलावात उत्साहात सुरुवात झाली.

स्पर्धेचे प्रास्ताविक अरुण सावंत यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेशजी दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलतरण तलावाची पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार सुरेशजी भोळे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत, “खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील होते. यावेळी बोलताना त्यांनी जळगावच्या मातीत जलतरणासारख्या खेळाला मिळत असलेले प्रोत्साहन अभिमानास्पद असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा देत जळगाव जिल्हा प्रौढ जलतरण असोसिएशनचे कौतुक केले. असोसिएशनने राज्यासाठी उत्तम खेळाडू घडविले असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण किनगावकर, प्रमोद अमृतराव पाटील, अॅड. आर. आर. पाटील, सुनील चौधरी, डॉ. शिरवाते, दिलीप बापू पाटील, कमलेश मणियार, अनिल बाफना, प्रा. प्रतिभा पाटील आणि अरुण सावंत उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून २०० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेतला. पुरुष व महिला स्पर्धकांनी २००, १०० व ५० मीटर फ्रीस्टाइल, १०० व ५० मीटर बॅकस्ट्रोक तसेच १०० व ५० मीटर बटरफ्लाय आदी प्रकारांत सहभाग नोंदविला.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रथम क्रमांकासाठी सुवर्णपदक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रौप्यपदक व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी कांस्यपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्पर्धा आयोजक दिगंबर मुकुंद यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्टेट व्हेटरन्स अॅक्वाटिक असोसिएशनचे पदाधिकारी, जळगाव जिल्हा प्रौढ जलतरण असोसिएशनचे पदाधिकारी, एकलव्य क्रीडा संकुलाचे पदाधिकारी व स्वयंसेवक तसेच पंच कमलेश नगरकर आणि संजय बाटवे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button