
जळगाव : जामनेर येथील रहिवासी व ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे कार्यकर्ते पवन माळी यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व संघटनात्मक चळवळींना नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांत पवन माळी यांनी ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावी कामगिरी बजावली आहे. विशेषतः मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्याचे यशस्वी आयोजन, तसेच जळगाव व जामनेर येथे काढण्यात आलेले मोर्चे आणि सामाजिक विटंबनेविरोधात केलेली आंदोलने यामुळे त्यांनी जिल्हाभरात आपली ठळक छाप निर्माण केली आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत समता परिषदेचे अध्यक्ष तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, तसेच बाळासाहेब कर्डक व अनिल नाळे या मान्यवरांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजातील विविध घटकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांच्या विचारांवर चालत समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या कार्यात मोलाचे सहकार्य करणारे रमेश वराडे यांचेही सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.






