
पाचोरा – पाचोरा पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंद रेकॉर्डमध्ये खाडाखोड झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते पंकज राजेंद्र पाटील (रा. तारखेडा खु., ता. पाचोरा) यांनी केला आहे. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे लेखी तक्रारीत केली आहे.
पाटील यांच्या माहितीनुसार, न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना त्यांच्या आजी, अनुसयाबाई केशव पाटील यांचा मृत्यू दाखला आवश्यक होता. त्यांनी दि. १५ मे २०२५ आणि दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती पाचोरा येथे नक्कल मिळवण्यासाठी अर्ज केले. मात्र आजतागायत संबंधित मृत्यू दाखला उपलब्ध झाला नसल्याचे ते म्हणतात.
पंचायत समितीकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, मूळ मृत्यू नोंद रेकॉर्डवर “उभ्या बाणासारखी गुणाकाराची फुली” दिसल्याचे नमूद आहे. त्यामुळे मूळ अभिलेखात खाडाखोड झाल्याचा संशय निर्माण झाला असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
संबंधित तक्रारीत असेही सांगितले आहे की, जन्म-मृत्यू नोंदींमध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती फक्त सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने व नियमानुसारच होणे बंधनकारक आहे. मात्र खाडाखोड आढळल्याने तत्कालीन अभिलेख कक्ष अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
यापूर्वी गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पंचायत समिती स्तरावर चौकशी आदेश देण्यात आला होता. परंतु अहवाल अपूर्ण असल्याचे आढळून पुन्हा द्विस्तरीय समिती नेमली गेली. तब्बल नऊ महिने उलटूनही अहवाल सादर न झाल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाटील यांनी नमूद केले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ अंतर्गत रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून कठोर प्रशासनिक कारवाई आणि भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४६५, ४६८, ४७१ तसेच BNS कलम ३३५, ३३८, ३४० अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाटील यांनी प्रशासनाला तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सूचना दिली आहे, अन्यथा प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





