

जळगाव दि.२८ – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रमाचे महात्मा गांधी उद्यान येथे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या बद्दल अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी उलगडून सांगणारी, महात्मा गांधीजींचा शोध घेणा-या एक सुंदर संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. प्रदिप जोशी, अनिष शहा, स्वरुप लुंकड, अनिल कांकरिया, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. राधेश्याम चौधरी, सर्व सेवा समितीचे रत्नाकर पांडे, अँड.जमिल देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे शब्दगंध दिवाळी अंक देऊन सन्मानित केले गेले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे कार्यक्रमाच्या मध्यांतरात उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर झाला.

श्रद्धा कुलकर्णी यांनी ‘वंदे मातरम्’ ने कार्यक्रमाची सुरुवात केली तद्नंतर त्यांनी दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत…., रघुपति राघव राजाराम पतीत पावन सिताराम… हि भजने गायली व मानवतेचा प्रकाश दिसतो, सत्याग्रही नव नगर निघाले हि कविता सादर केले. भेटी लागे जीवा.. सावळे सुंदर रूप मनोहर..विठ्ठल नामाचा रे टाहो.. या रचना वरूण नेवे यांनी सादर केले. ‘मै तो मेरी पास में हे’ आणि ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ हा गांधीजींना प्रिय अभंग सुदिप्ता सरकार यांनी सादर केला. अवघा रंग एक झाला… अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम… ही रचना अंजली धुमाड यांनी सादर केली.
शंभू पाटील यांनी निवेदनामध्ये महात्मा गांधीजींचे शिक्षण, आफ्रिकेतील रेल्वेमध्ये घडलेला प्रसंग, स्वालंबनासाठी गांधीजींचा सत्याग्रह, स्वराज्याची संकल्पना, विनोबा आणि गांधी यांनी दिलेला एकतेचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी याच्यातील पुणे करार यासह गांधीजींचा जीवनप्रवास उलगडून दाखविला. कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची होती. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार होते. यात गोविंद मोकाशी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन च्या महिला सहकारी यांनी सुतकताई केली.


