जळगावक्राईमसामाजिक

मोहराळ्यात अवैध दारूधंद्याविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मोहरळा ता. यावल – यावल तालुक्यातील मौजे मोहराळा येथे सुरू असलेल्या अवैध दारूधंद्याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास यावल पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण तसेच व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मोहराळा गावात अनेक ठिकाणी राजरोसपणे अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दारूच्या व्यसनामुळे युवक भरकटत असून अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडत आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराबाबत वारंवार तोंडी तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

गावातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर विशेष पथकाद्वारे धडक कारवाई करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच या अवैध धंद्याला संरक्षण देणाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशनचे यावल तालुका सचिव गौरव सोनवणे, ऑल इंडिया पँथर सेनेचे यावल तालुका अध्यक्ष सतीश अडकमोल, विनोद अडकमोल, गोविंदा सोनवणे, सचिन वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

निवेदनानंतरही तातडीने कारवाई न झाल्यास भीम आर्मी भारत एकता मिशनच्या नेतृत्वाखाली यावल पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. “मोहराळा दारूमुक्त झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button