
जळगाव : वाढती विजेची मागणी, पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व आणि भविष्यात उद्भवू शकणारे वीजसंकट लक्षात घेता, अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवून मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या इको क्लबने सौरऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या वतीने पालकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते. तसेच दीर्घकालीन दृष्टीने वीजबिलात बचत होण्याबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना मिळते.
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही नैसर्गिक, स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा आहे. त्यामुळे प्रत्येक घराने शक्यतेनुसार सौरऊर्जेचा स्वीकार केल्यास भविष्यातील ऊर्जेची गरज भागविण्यास हातभार लागू शकतो. केवळ शासनानेच वीजसंकटावर उपाय शोधण्याची वाट न पाहता प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर ऊर्जा बचतीसाठी योगदान द्यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर याविषयी सातत्याने जागृती केली जात आहे. विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने त्यांच्या माध्यमातून हा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘आज सौरऊर्जेचा स्वीकार करूया, उद्याच्या ऊर्जासुरक्षेसाठी हातभार लावूया!’ या संदेशातून शाळेने पालक आणि समाजाला ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केले आहे.
संस्थाध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मुकेश नाईक, इको क्लब प्रमुख रूपाली आव्हाड, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी या जनजागृती उपक्रमासाठी प्रयत्नशील आहेत. या उपक्रमासाठी स्नॅप सोलर एनर्जीचे संचालक सागर सानप यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे या पर्यावरणपूरक जनजागृती उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी परिवाराच्या वतीने पालकांना सौरऊर्जेचा स्वीकार करण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.






