जळगावशैक्षणिक

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जळगाव, दि. 14 (वार्ताहर) : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, संचालक वासुदेव सानप, मुख्याध्यापक दिवाकर जोशी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे तसेच शिक्षिका राजश्री तायडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान इयत्ता 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सादर केली. यात गौरी पवार, वैष्णवी सिद्धार्थ, नंदिनी पवार, ओम पवार, भावना शेजवळ, मोहिनी शिवदे आणि खुशी माळी यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच राज्यघटनेतील योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी आलिया पिंजारी, कल्याणी कोचुरे, वैष्णवी सिद्धार्थ व सहविद्यार्थ्यांनी गीत सादर केले.

प्रमुख अतिथी राजश्री तायडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्य व विचारांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात अशोक लाडवंजारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समाजसुधारक कार्यासह ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या संदेशाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमाचे नियोजन अमित तडवी व सरस्वती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आलिया पिंजारी (इयत्ता 9 वी) हिने केले, तर आभार प्रदर्शन कल्याणी कोचुरे (इयत्ता 9 वी) हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button