

भुसावळ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी मंगळवार, दिनांक 15 एप्रिल रोजी भुसावळ तालुक्यातील किन्ही आणि साकरी या गावांना अचानक भेट देत ग्रामविकासाच्या विविध घटकांचा आढावा घेतला.
या दौऱ्यात त्यांच्या समवेत भुसावळ गटविकास अधिकारी श्री. सचिन पानझडे देखील उपस्थित होते. सकाळच्या सत्रात त्यांनी दोन्ही गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयांची पाहणी केली. त्यानंतर तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांनी जमिनीवर बसून शालेय पोषण आहाराची चव घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गावात सुरू असलेल्या घरकुल योजनांचा आढावा घेत श्रीमती करनवाल यांनी बांधकामांच्या दर्जाची पाहणी केली. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, याचा तपास घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या.
प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन करत त्यांनी विविध उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शनही दिले. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज असून, प्रशासन या दृष्टीने कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




