

जळगाव : सदगुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अनिता वानखेडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रतिभा पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मेजर ध्यानचंद यांच्या अविस्मरणीय कारकिर्दीचा आढावा घेत सांगितले की, “देशाला सलग तीन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे आणि आपल्या खेळाने संपूर्ण जगाला वेड लावणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची क्रीडा क्षेत्रातील देणगी अतुलनीय आहे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता वानखेडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन प्रवासाचे स्मरण करून सांगितले की, “त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद (प्रयागराज) येथे झाला. भारतीय सैन्यातील कारकीर्दीतून त्यांनी आपल्या क्रीडावृत्तीला दिशा दिली. त्यांच्या स्मरणार्थ केंद्र शासनाकडून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ दिला जातो. मात्र त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार न मिळाल्याची खंत आजही क्रीडाजगताला आहे.”
द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्या खेळातील अनुभव व विचार व्यक्त केले. प्राध्यापक वृंद यांनीही खेळाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपाली पाटील यांनी केले. प्रा. डॉ. नारायण खडके यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, श्री. पंकज वाघ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




