

जळगाव : भारतीय संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेल्वेच्या नव्या अथवा जुन्या कोणत्याही एक्सप्रेस गाडीला “संविधान एक्सप्रेस” नाव देण्यात यावे, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत (सतीष) गायकवाड यांनी खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, येत्या 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधानाला 76 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून, भारतीय रेल्वेने एका गाडीला “संविधान एक्सप्रेस” असे नाव दिल्यास संपूर्ण देशात संविधानाबद्दल जनजागृती होईल. देशात विविध रेल्वेगाड्यांना महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहेत. त्याच धर्तीवर संविधानाच्या गौरवशाली सन्मानार्थ हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांनी अमरावती – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस, नागपूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस असे दोन पर्याय सुचवलेले आहेत. या संदर्भातील निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री रेखाताई खडसे तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री यांनाही देण्यात आली आहे.




