जळगावक्राईम

जळगाव ‘डायल 112’चे वास्तव: 4 महिन्यांत 12,241 कॉल्स; गुन्हे व महिला तक्रारींचे प्रमाण जास्त.

जळगाव : जिल्ह्यातील आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेताना ‘डायल 112’ सेवेवर जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत एकूण 12,241 कॉल्स प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या कॉल्सच्या स्वरूपाचा अभ्यास केला असता गुन्हे संबंधित व महिला तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

प्राप्त आकडेवारीनुसार, गुन्हे संबंधित 3,312 कॉल्स सर्वाधिक असून त्यापाठोपाठ महिला संबंधित 2,986 कॉल्स नोंदवले गेले आहेत. तसेच संकट/त्रास (1,435), चौकशी (1,107) आणि माहिती (979) यांसारख्या कॉल्सचाही मोठा वाटा आहे. ज्येष्ठ नागरिक (463), शाब्दिक वाद (459), चोरी (458) आणि रस्ते अपघात (369) यासंदर्भातील कॉल्सही लक्षणीय आहेत.

याशिवाय बालकांशी संबंधित 222, आगीच्या घटना 92, प्राण्यांशी संबंधित 92, बेपत्ता व्यक्ती 67, दंगल 58 आणि आपत्कालीन कॉल्स 35 इतकी नोंद आहे. निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाचे 28, जिवंत व्यक्ती आढळणे 22, मृतदेह 20 आणि बेवारस वस्तू 19 कॉल्स प्राप्त झाले. संशयास्पद 8, तोडफोड 4 तसेच नैसर्गिक आपत्ती व दहशतवादी हल्ल्याचा प्रत्येकी 1 कॉल नोंदवण्यात आला असून मानवनिर्मित आपत्तीचा एकही कॉल आलेला नाही.

दरम्यान, ‘डायल 112’ ही ‘एक देश, एक नंबर’ संकल्पनेवर आधारित अत्याधुनिक एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (ERSS) असून ती 24 तास कार्यरत असते. या एकाच क्रमांकावरून पोलीस (100), अग्निशमन दल (101), रुग्णवाहिका (108) आणि महिला हेल्पलाइन (1091) अशा सर्व सेवा उपलब्ध होतात.

या प्रणालीची वैशिष्ट्ये म्हणजे कॉल केल्यानंतर काही मिनिटांत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट, तसेच जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे कॉल करणाऱ्याचे अचूक लोकेशन त्वरित मिळणे. महाराष्ट्रात नवी मुंबई आणि नागपूर येथे केंद्रीकृत कॉल सेंटर कार्यरत असून, तेथून संबंधित घटनेची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस पथकाला पाठवली जाते.

प्रत्येक पोलीस वाहनात ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ (MDT) प्रणाली बसवण्यात आली असून त्यावर घटनेचे तपशील आणि नकाशा त्वरित उपलब्ध होतो. त्यामुळे घटनास्थळी जलद व अचूक प्रतिसाद देणे शक्य होते.

मारामारी, चोरी, अपघात, आग, तसेच महिला, मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांना तातडीची मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी ‘डायल 112’ सेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या सुविधेचा वापर केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button