
जळगाव | दि. ११ मे २०२६ — जळगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू केलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेसह तिला आश्रय देणाऱ्या व्यक्तीवर शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत शनिपेठ पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. १० मे रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही महिला आढळून आली. तपासात तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट अथवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिने अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून जळगावात वास्तव्यास असल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये बांगलादेशी महिला कोणीका राणी शामलचंद्र राय हिच्यासह चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याचा समावेश आहे. संबंधित महिला ही बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही तिला पोलिसांपासून लपवून ठेवत आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
सदर प्रकरणी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत कलम ८, २१ व २४ नुसार गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करीत आहेत.
दरम्यान, जळगाव पोलिसांकडून अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.





