
जळगाव: शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांच्या वतीने शाळाबाह्य व दिव्यांग विद्यार्थी शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत विद्यालयातील शिक्षकांकडून परिसरात घरभेटी देऊन शाळाबाह्य, स्थलांतरित तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे. कोणतेही बालक शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू नये, या उद्देशाने विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणे तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
शिक्षणाचा हक्क प्रत्येक बालकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असून पालक, नागरिक व समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
“प्रत्येक बालक शाळेत, प्रत्येक बालक शिक्षित” हा संदेश देत विद्यालयातर्फे ही मोहीम उत्साहात राबविण्यात येत असून शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक परिश्रम घेत आहेत.






