जळगावक्राईम

यावल तालुक्यात ‘पॉलिश गॅंग’ सक्रिय; विरोदा येथील महिलांची फसवणूक

जळगाव – यावल तालुक्यात सध्या ‘पॉलिश गॅंग’ सक्रिय झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून विरोदा गावातील अनेक महिलांना या टोळीने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. दागिने तसेच तांब्या-पितळाच्या भांड्यांना पॉलिश करून चमकवून देण्याचा दावा करत अज्ञात महिलांनी नागरिकांची फसवणूक केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात महिला रिक्षाने विरोदा गावात आल्या होत्या. या महिलांनी गावातील गल्लीबोळांत फिरून काही पॉलिश केलेली तांब्याची, पितळाची भांडी तसेच सोन्या-चांदीचे दागिने दाखवत स्थानिक महिलांचा विश्वास संपादन केला. “आम्ही तुमची भांडी फक्त १० ते २० रुपयांत पॉलिश करून देतो,” असे सांगत त्यांनी अनेक महिलांकडून तांब्या-पितळाची भांडी घेतली.

सदर महिलांनी “आम्ही पिंपरुळ फाट्यावर बसलो आहोत, उद्या पॉलिश करून भांडी परत आणून देतो,” असे सांगून वस्तू सोबत नेल्या. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही त्यांनी कोणत्याही महिलांची भांडी परत केली नाहीत. यानंतर संबंधित महिलांनी पिंपरुळ फाट्यावर चौकशी केली असता अशा कोणत्याही महिला तेथे नसल्याचे समोर आले. त्यामुळे भांडी घेऊन त्या महिलांनी पसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकारामुळे गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा :

अनोळखी व्यक्तींना मौल्यवान वस्तू किंवा दागिने पॉलिशसाठी देऊ नयेत. घरातील मौल्यवान वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करू देऊ नका. घरात एकटे असताना अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

(या बातमीत प्रतिकात्मक छायाचित्र वापरलेले आहे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button