
जळगाव – ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांना होणाऱ्या धान्य पुरवठ्यात अनियमितता होत असल्याच्या माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना सखोल चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
माहिती अधिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीत स्वस्त धान्य दुकानांना मिळणाऱ्या गहू व तांदळाच्या पोत्यांवर अधिकृत सील किंवा मशीनद्वारे केलेली शिवण नसून अनेक पोती हाताने शिवलेली असल्याचे नमूद केले आहे. तसेच लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असल्याची व महिनाअखेरीस धान्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाबही तक्रारीत मांडण्यात आली आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, त्याबाबत अर्जदारास कळवावे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
या आदेशामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य पुरवठा प्रक्रियेवर अधिक प्रभावी देखरेख होऊन अनियमिततेला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






