अमेरिका सरकारचा निषेध करून, एकता संघटनेची आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगात तक्रार


जळगाव – अमानवी पद्धतीने अमेरिकेत अनधिकृत वास्तव करणाऱ्या १०४ जणांची पहिली तुकडी अमृतसर येथे ज्या पद्धतीने आणली ती पद्धत म्हणजे अमानवीय असून त्यामुळे भारताचे सार्वभौमत्व व सन्मानावर आघात करण्यात आलेला आहे. या अमानवी कृत्याची नोंद आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घ्यावी व अमेरिकेवर कार्यवाही करावी अशी मागणी जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे करण्यात आली आहे. सदरची लेखी तक्रार आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेला भारतातील दिल्ली येथील अध्यक्ष नेमसिंग प्रेमी यांच्याकडे करण्यात आली असून त्या तक्रारीची प्रत भारतातील अमेरिकी दूतावास चे प्रमुख जॉर्गन के एड्रयुज व भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.
भारताच्या पंतप्रधानांनी नोंद घ्यावी व कारवाई करावी
भारताचे पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांनी केलेल्या अमानवी कृत्याची दखल घेऊन पुढील अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या भारतीय तुकडीला भारत सरकारने स्वतः आपले विमान पाठवून आपल्या भारतीयांना भारतात परत आणावे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे.
एकता संघटनेचे निदर्शने
जी एस ग्राउंड मैदान लगत कोर्ट चौकात संघटनेतर्फे अमेरिकी सरकारचा निदर्शनाद्वारे निषेध करण्यात आला. यावेळी संघटनचे समन्वयक फारुक शेख , मतीन पटेल व मजहर खान यांनी अमेरिकी सरकारच्या अमानवी कृत्याचा पाढा वाचून त्याचा निषेध केला. आंदोलनात यांच्यासह एकता संघटनेचे नदीम मलिक, आरिफ देशमुख, युसुफ पठाण, नजमुद्दीन शेख, कासिम उमर अजीम शेख, अनिस शहा, बोरगावचे मोहसीन पठाण व नाजीम खान यांची उपस्थिती होती.




