राज्यसामाजिक

माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर म्हणजे जनतेच्या हक्कांचे रक्षण – अब्राहाम आढाव

शिरूर – लोकशाही मजबूत होण्यासाठी नागरिकांचा सशक्त सहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी माहिती मिळवण्याचा अधिकार हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरते, असे प्रतिपादन माहिती अधिकार चळवळीतील प्रख्यात कार्यकर्ते अब्राहाम आढाव यांनी केले.

शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके सर यांच्या पुढाकाराने, ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्या सहकार्याने, पंचायत समितीतील सर्व विभागांना ‘माहितीचा अधिकार अधिनियम २००५’ या विषयावर एक दिवसीय सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात शासकीय कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याची मूलभूत तत्त्वे, त्याचे उपयोग आणि त्यामागची लोकशाहीची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण सत्रात बोलताना अब्राहाम आढाव यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माहिती अधिकार कायदा म्हणजे केवळ सरकारी फाईल्स उघडण्याचे साधन नव्हे, तर प्रशासनातील अपारदर्शकता, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारावर जनतेच्या आवाजाने घातलेला रोख आहे. हा कायदा केवळ वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी वापरू नये, तर व्यापक जनहितासाठी  म्हणजेच समाजाच्या हितासाठी, सार्वजनिक प्रश्नांवर उत्तरदायित्व ठरवण्यासाठी, शासकीय निधीचा योग्य उपयोग झाला का हे पाहण्यासाठी – वापरणे अधिक आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, “भारतीय संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच माहिती अधिकार कायद्याचे मूळ आहे. आणि जेव्हा सामान्य नागरिक सजगतेने या हक्काचा वापर करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होते.” गटविकास अधिकारी महेश डोके सर यांनी या उपक्रमाचे आयोजन करून कर्मचारी वर्गात जनजागृती निर्माण केली. कर्मचारी वर्गानेही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित सर्वांनी एकमताने सांगितले की, “माहिती अधिकार कायदा म्हणजे नागरिकांच्या हातात दिलेले लोकशाहीचे बळ आहे – त्याचा वापर जबाबदारीने आणि जनहितासाठी केला तर समाजात खरे परिवर्तन शक्य आहे.” या प्रेरणादायी प्रशिक्षणासाठी सर्वांनी अब्राहाम आढाव यांचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button