जळगावसामाजिक

अरविंद देशमुख यांची ‘दै. जळगाव तरुण भारत’ संचालकपदी निवड

जळगाव, 2 एप्रिल 2025 – राजकीय , सामाजिक, आरोग्य, सहकार  क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या अरविंद देशमुख यांची ‘दै. जळगाव तरुण भारत’च्या संचालकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सर्जना मीडिया सोल्यूशन संचालित या दैनिकाच्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, सचिव संजय नारखेडे, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

संघर्षातून घडलेली पत्रकारिता

अरविंद देशमुख यांनी 2000 ते 2014 या कालावधीत ‘दै. तरुण भारत’च्या पहूर वार्ताहर म्हणून कार्यभार सांभाळला. परखड आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेमुळे त्यांनी स्थानिक तसेच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवर प्रकाश टाकत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. गावखेड्यातील समस्यांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याला मोठे महत्त्व आहे.

सहकार व औद्योगिक क्षेत्रातील योगदान

देशमुख हे केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांची जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारीही ते पार पाडत आहेत.

निवडीनंतर उत्स्फूर्त स्वागत

अरविंद देशमुख यांच्या संचालकपदी निवडीनंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पत्रकार, सहकार नेते, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह वाचकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

“संघर्षातून मिळवलेले यश अधिक कडसर असते. पत्रकारिता ही माझी ओळख असून, या नव्या जबाबदारीतून ‘दै. जळगाव तरुण भारत’च्या प्रगतीसाठी पूर्ण ताकदीने काम करेन,” असे देशमुख यांनी निवडीनंतर व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button