
जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दि. 10 एप्रिल (शुक्रवार) रोजी बी.एड. द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे या होत्या. सूत्रसंचालन प्रथम वर्ष विद्यार्थी-शिक्षक साक्षी पाटील यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना प्रथम वर्षातील विद्यार्थी-शिक्षक हर्षदा जोशी तसेच द्वितीय वर्षातील प्रियंका पाटील, भाग्यश्री सोनवणे, अक्षय जाधव व मीनाक्षी पाटील यांनी आपल्या दोन वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव मांडले. महाविद्यालयातील शिक्षकांनी दिलेला पाठिंबा, मार्गदर्शन व सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. निरोपाच्या क्षणी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत भावनिकता दाटून आली होती.
यावेळी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे तसेच ग्रंथपाल पंकज वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.
या वर्षाचा ‘उत्कृष्ट विद्यार्थी’ म्हणून अक्षय जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्षातील विद्यार्थी-शिक्षक स्नेहा वाढई यांनी केले. शेवटी सर्वांनी वरण-बट्टी व वांग्याच्या भाजीचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






