जळगावक्राईम

जळगाव जिल्ह्यात रात्र गस्त होणार ‘रिझल्ट ओरिएंटेड’; घरफोडी व वाहन चोरी रोखण्यासाठी पोलिसांचा नवा ॲक्शन प्लॅन

जळगाव : जिल्ह्यात वाढत्या घरफोडी (HBT) आणि वाहन चोरीच्या (MVT) घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने रात्र गस्तीची पद्धत अधिक व्यावसायिक, प्रभावी आणि ‘निकालभिमुख’ करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक स्वरूपातील केवळ पोलीस स्टेशन भेटी, लॉकअप तपासणी किंवा औपचारिक फेरफटका यापलीकडे जाऊन आता प्रत्यक्ष फिल्डवर गुन्हेगारांवर वचक बसवणाऱ्या कारवायांवर भर दिला जाणार आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने रात्र गस्तीच्या रचनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून, संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता रात्र गस्त ‘टार्गेट-बेस्ड कोम्बिंग ऑपरेशन’ स्वरूपात राबवली जाणार आहे. गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये सर्व कर्मचारी एकत्रितपणे अचानक तपासण्या करतील. संशयास्पद हालचाली, फिरणारी वाहने व संशयित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच जिल्ह्यातील प्रमुख प्रवेशद्वारे, टोल नाके आणि महामार्गांवर निश्चित वेळेऐवजी अचानक नाकाबंदी (Surprise Checking) केली जाणार आहे. नाकाबंदीची वेळ आणि ठिकाण सतत बदलले जाणार असल्याने गुन्हेगारांना पोलिसांच्या हालचालींचा अंदाज बांधणे कठीण होणार आहे. अंधारे भाग, उद्याने, मोकळी मैदाने आणि ओसाड परिसरांचीही विशेष तपासणी केली जाणार आहे.

रात्र गस्त पथकांकडे आता जेलमधून सुटलेले आरोपी, जामिनावर असलेले गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर्स आणि फरार संशयितांची अद्ययावत माहिती उपलब्ध राहणार आहे. त्यांच्या वास्तव्याची व हालचालींची प्रत्यक्ष पडताळणी रात्रीच्या वेळी करण्यात येणार असून, अलीकडील घरफोडींच्या कार्यपद्धतीचाही (Modus Operandi) अभ्यास केला जाणार आहे.

गस्तीची वेळ आणि मार्ग यामध्येही सातत्याने बदल करण्यात येणार आहेत. निवासी भाग, एमआयडीसी क्षेत्र आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये पोलिसांच्या वाहनांचे सायरन व अंबर दिव्यांचा वापर करून प्रतिबंधात्मक उपस्थिती दाखवली जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर मानसिक दबाव निर्माण होण्यासोबत नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस आता केवळ रस्त्यांवरून गस्त घालण्यापुरते मर्यादित न राहता सोसायट्यांचे वॉचमन, सुरक्षा रक्षक आणि नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. बंद घरे, उघडी गेट्स किंवा संशयास्पद परिस्थिती आढळल्यास त्वरित नागरिकांना सतर्क केले जाणार आहे.

याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करणे तसेच एटीएम केंद्रांना वारंवार भेट देऊन सुरक्षा पाहणी करणे गस्त पथकासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या भागात एमआयडीसी व कारखाने आहेत, त्या औद्योगिक परिसरांमध्ये विशेष पेट्रोलिंग राहणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण मोहिमेवर ‘जिल्हा रात्र गस्त अधिकारी’ तसेच विभागीय अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित मॉनिटरिंग होत असल्याने रात्र गस्त अधिक शिस्तबद्ध, जबाबदार आणि प्रभावी होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

(या बातमीत प्रतिकात्मक छायाचित्र वापरलेले आहे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button